Monday 22 January 2018

जातीविरहित समाज निर्मितीसाठी

जगात जात फक्त भारतातच आहे, आणि भारतातील राजकारण, समाजकारण व अर्थकारण त्यावर आधारित आहे। समाजात जाती खोलवर रुजल्या व भिनल्या असल्या तरीही योग्य प्रयत्न केल्यास जातीविरहित समाज निर्माण करणे निश्चितच शक्य आहे. याचा उहापोह या लेखात पुढे केला आहे.
.
जन्मावर व धर्माशी जोडलेल्या जाती ब्राह्मणांनी तयार केल्या हे साक्षात सत्य आहे। त्यांनी स्वतः ला उच्चतम दर्जा घेतला। इतरांना चढत्या उतरत्या क्रमाने दर्जा दिला। त्यामुळे आपण कोणा जातीपेक्षा तरी श्रेष्ठ आहोत या कल्पनेने अनेक तथाकथित वरच्या जातींनी जातीप्रथा टिकवून व मजबूत करून ठेवली। वरच्या जाती खालच्या जातींचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय शोषण करीत राहिल्या। त्या शोषणाचा आनंद उपभोगत राहिल्या। त्यामुळे त्या जातीभेद टिकून राहतील याची परिपूर्ण व विविध पद्धतींनी काळजी घेत राहिल्या।
.
अशा प्रकारे जाती टिकवणारे वरच्या स्तरातील लोक असताना जाती नष्ट करण्याचे प्रयत्न सुद्धा वरच्या स्तरावरून होणे आवश्यक आहे। परंतु जातीय श्रेष्ठतेची भावना त्यांना जात सोडू देत नाही। वरच्या जातीच्या लोकांना जातीचे असे फायदे नसते तर त्यांनी जाती सोडल्या असत्या, ते जातिनिरपेक्ष झाले असते, लग्न वगैरेंत त्यांनी जातीना पूर्ण फाटा दिला असता, जातींवर आधारित संस्था बरखास्त करून टाकल्या असत्या। पण वरच्या जातीच्या लोकांना जातींचे असले फायदे सोडवत नाहीत। त्यामुळे ते जात सोडत नाहीत। उलट खालच्या जातीच्या लोकांना जात सोडण्याचे सल्ले व उपदेश देत राहतात। खरेतर वरच्या जातीच्या लोकांना जातीचे अमर्यादित फायदे हजारो वर्षांपासून सातत्याने मिळत आले आहेत। खालच्या जातीच्या लोकांना जातीचे मर्यादित फायदे गेल्या 50-60 वर्षांतच मिळत आले आहेत।
.
काहीही असले तरी आज जाती नष्ट करणे आवश्यक आहे। जातिनिरपेक्ष समाज निर्माण करणे आवश्यक आहे। याची सुरुवात वरच्या स्तरापासून म्हणजे ब्राह्मणांपासून होणे आवश्यक आहे। त्यांना जाती नको असतील व जात हा कलंक आहे असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी स्वतः ब्राह्मण असल्याचा अभिमानच नव्हे तर ती जाताच सोडून द्यावी। वास्तविकत: जातीचे संबोधन एक शिवी आहे। हे उच्च जातीय लोकांनी समजून वागणे आवश्यक आहे। आपण मानव आहोत याचाच सार्थ अभिमान बाळगावा। जातींवर आधारित पुरोहितगिरी, त्यातून लोकांची लूट सोडून द्यावी। त्यांच्या जातींवर आधारित संस्था पूर्णपणे विसर्जित कराव्या। मॅट्रिमोनि मध्ये चुकूनही जात येऊ नये याची काळजी घ्यावी। ब्राह्मणांच्या एकाधिकार शाहीवर चालणाऱ्या व वेगळा देखावा करणाऱ्या संस्थासुद्धा यात येऊ शकतील। आपल्या देशात आडनावे जातीप्रधान आहेत। त्यामुळे ही आडनावाची प्रथा सुद्धा वरून नष्ट करावी किंवा बदलावी। इत्यादी उपाय वरच्या जातीतून व्हावेत।
.
जातीच्या उतरंडीतील उच्चतम स्तरावरून वरील प्रकारचे प्रयत्न झाल्यास नंतर ते खालच्या स्तरांवर झिरपत येतील। हळूहळू त्यांच्या खालच्या स्तरांवरील लोक आपली जात सोडायला लागतील। जातिनिरपेक्ष समाज निर्माण होऊ लागेल।
.
जातीविरहित समाजाची निर्मिती म्हटली की वरच्या जातीचे लोक एकदम जातींवर आधारित आरक्षण व सवलतींवर घसरतात। पण जाती होत्या व आहेत म्हणून आरक्षण आहे। जाती नष्ट झाल्यास त्यावर आरक्षण सुद्धा राहणार नाही हे साधे गणित आहे।
.
आज जातीभेद आधीच्या सारखा राहिलेला नाही, त्यामुळे जातीवर आरक्षण असण्याची गरज नाही असे उडते विधान काही उथळ लोक करतात। वास्तविकत: जातींभेदांच्या हजारो वर्षांच्या परिणामांची दखल ते घेत नसतात। मेलेल्या जनावरांचे मांस खाऊन गुजारा केलेल्या अस्पृश्यांच्या पिढ्या आजही त्यामुळे सिकल सेल सारख्या आजाराला बळी पडत आहेत। उच्च जातीय लोकांमध्ये हा आजार का दिसत नाही? भंगी कामामध्ये उच्च जातीय लोकांचे 50 टक्के आरक्षण ठेवा अशी मागणी का होत नाही? पुरोहितशाही मध्ये आजही ब्राह्मणांचे 100 टक्के आरक्षण कसे चालते? नागपूरच्या एक सर्वेक्षणात सायकल रिक्षा चालवणाऱ्यांमध्ये खालच्या जातीचेच लोक का सापडले? अशी अनेक उदाहरणे देता येतील। जातीनिहाय आर्थिक संपन्नतेचा सर्व्हे केल्यास हे चित्र अधिक स्पष्ट दिसून येते। या देशांत 1 टक्का लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे अशी माहिती पुढे आली आहे। दोन वर्षांपूर्वी या 1 टक्क्यांकडे 56 टक्के संपत्ती होती। या 1 टक्क्यांत कोणत्या जातीचे लोक आहेत, याची माहिती प्रकाशित केल्यास येथील अर्थकारण व उच्च जात यांचा असलेला घनिष्ठ संबंध पूर्ण स्पष्ट होईल। म्हणजे वर म्हटल्या प्रमाणे जातीप्रथेचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात अमर्याद फायदे हजारो वर्षे उच्च जातीय लोकांनी उपभोगले। त्याचा परिणाम खोलवर झाला आहे। या वस्तुस्थिती मुळेच मार्क्सचा वर्गीय दृष्टीकोन येथील जातीय उतरंडीपुढे पूर्णपणे नापास झाला आहे। अशा प्रकारच्या पैलूंचा विचार ते लोक करत नाही। म्हणून आरक्षण त्यांच्या डोळ्यात खुपते। खरे तर खालच्या जातीत शैक्षणिक स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असल्याने आरक्षित व ओपन यातील मार्कांची गॅप अलीकडे खूपच कमी झाली आहे। त्यामुळे कालांतराने आरक्षण फारसे विलोभनीय राहणार नाही, हेही दिसून येत आहे। आरक्षण हे जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी लागू केलेले एक तत्व होय, हे लक्षात आले की त्याविषयीचा गुंता सुटण्यास मदत होईल।
.
खरे तर स्वतः च्या उच्च जातीचा अभिमान बाळगणाऱ्या, वरच्या जाती बघून लग्ने लावणाऱ्या, उच्च जातींच्या संस्था मिरवणाऱ्या, जातींचे परंपरागत उच्च धंदे करणाऱ्या, जातींवर आधारित प्रथा-परंपरा-अंधश्रद्धा जपणाऱ्या व अशा विविध प्रकारे जाती जिवंत ठेवणाऱ्या उच्च जातीय लोकांना जातीवर आधारित आरक्षणाच्या विरोधात बोलण्याचा किंवा तसा विचार करण्याचा काहीही अधिकार नाही। त्यातही आनंदाची गोष्ट म्हणजे खालच्या जातींमध्ये जातीविरहित होण्याची प्रक्रिया या ना त्या प्रकारे सुरू झाली आहे व वेग घेते आहे। बौद्ध धर्म घेतलेल्या लोकांमध्ये हे जातीनिरपेक्षतेचे प्रमाण जास्त दिसून येत आहे। मात्र जातींच्या अहंगंडातून उच्च जातीय लोक बाहेर पडले व त्यांनी स्वतः खरोखरच जाती सोडल्या तर या देशातून जाती नष्ट होण्याचा मार्ग सुकर व सुलभ होऊन जाईल। जातीविरहित समाज निर्मितीचा इतका सरल असा दुसरा कोणताही मार्ग सध्या तरी अस्तित्वात नाही असे दिसते। #adinama
- धनंजय आदित्य