Sunday 31 December 2017

भारतीयांचे पहिलेच शिक्षक प्रशिक्षण केंद्र

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव 
जोतीराव व सावित्रीमाई यांनी पुणे परिसरात कमीत कमी १८ शाळा काढल्या होत्या. या सर्व शाळांचे संचालन करण्याची जबाबदारी सावित्रीमाई यांच्यावर होती. ती त्यांनी लीलया पार पाडली. इतक्या शाळांचे संचालन करणारी इतिहासातील पहिली संचालिका म्हणून सावित्रीमाई यांचेच नाव घ्यावे लागते. एकापाठोपाठ शाळा काढल्यामुळे तेथे शिकवायला शिक्षक मिळत नव्हते. अशा शाळांमध्ये शिकवण्यासाठी सहसा उच्च वर्णीय शिक्षक तयार होत नसत.
.
विद्यार्थी ज्या स्तरांतून येतो त्या स्तरातील, त्या समाजातील शिक्षक त्याना शिकवण्यासाठी असल्यास अध्यापन व अध्ययन चांगले होते, असा अनुभवसिद्ध सिद्धांत त्यांनी मांडला होता. त्यामुळे बहुजन वर्गातून शिक्षक तयार करण्यासाठी फुले दाम्पत्याने एक शिक्षक प्रशिक्षण केंद्र काढले होते. त्याला नॉर्मल स्कूल हे नाव दिले. याप्रकारे भारतीयांनी शिक्षक प्रशिक्षण केंद्र काढून यशस्वीपणे चालविण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग होता.
.
या नॉर्मल स्कूलमधून पास झालेली पहिली विद्यार्थिनी म्हणजे उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख होय. त्यांचे शिक्षक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या सावित्रीमाईबरोबर अध्यापनाचे कार्य करू लागल्या. फातिमा शेख या मुस्लीम समाजातील पहिल्या शिक्षिका होत. अशा प्रकारे मुस्लीम समाजातील पहिल्या अध्यापिका तयार करण्याचा मान जोतीराव व सावित्रीमाई यांना जातो.
.
सावित्रीमाईंनी 1852 साली महिला सेवा मंडळ नावाची संस्था स्थापन केली होती. त्याच्या अध्यक्षा श्रीमती जोन्स होत्या व सचिव सावित्रीमाई होत्या. त्या मंडळाच्या नियमित बैठका होत असत. स्त्रियांच्या समस्या व त्यांचे निवारण यावर त्यात चर्चा होत असे. सर्व जातीधर्माच्या महिलांना एकत्र आणण्यासाठी हळदीकुंकू व तिळगुळाचा कार्यक्रमही आयोजित केला जात असे. “कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या बायका आल्या तरी त्या एकाच जाजमावर बसतील. जातीभेद, पक्षपात न करता सर्वांना सारखेच धरुन हळदीकुंकू लावण्यात आणि तिळगुळ वाटण्यात येईल.” अशा मजकुराची निमंत्रण पत्रिका काढली होती. #adinama
-धनंजय आदित्य