Thursday 2 November 2017

कार्तिकी पौर्णिमेचे महत्त्व

इतर पौर्णिमेप्रमाणेच कार्तिक पौर्णिमा सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. या दिवशी धम्म संघाची स्थापना, महाप्रजापती गौतमीकडून संघाला चीवर दान, सारीपुत्ताचे परिनिर्वाण, काश्यप बंधूंची दीक्षा, सारनाथच्या मूलगंधकुटी विहारात तथागतांच्या अस्थींची स्थापना इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. त्याविषयी माहिती देणारा हा लेख...


त्रिशरणात बुद्ध, धम्म, व संघ या त्रिरत्नांचा अपरिहार्यपणे समावेश होतो. यापैकी तिसरे रत्न संघ याची स्थापना तथागत गौतम बुद्ध यांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी केली होती. त्यांनी साठ अर्हत भिक्खूनां घेऊन या दिवशी संघ स्थापन केला. त्यांना वेगवेगळ्या दिशेने जाऊन लोकांचे दुःख दूर करण्यास व धम्मप्रसार करण्यास सांगितले. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकम्पाय, हिताय सुखाय देव मनुस्सानं असा धम्म प्रसार करण्याचा संदेश दिला. संपूर्ण जगात मिशनरी पद्धतीने कार्य करणारी ही सर्वात पहिली यंत्रणा होती. या यंत्रणेने धम्म सर्व जगभर पसरवला. 

कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी महाप्रजापती गौतमी (जिने सिद्धार्थची आई महामाया यांच्या मृत्यूनंतर सिद्धार्थचे पालन पोषण केले) यांनी स्वतः तयार केलेले कठीण चीवर तथागतांना दान करण्याची इच्छा प्रगट केली. तथापि तथागतांच्या सूचनेप्रमाणे गौतमी यांनी संघाला ते चीवर दान केले. याप्रकारे कार्तिक पौर्णिमा ही चीवर दानासाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी भिक्कूंना कठीण चीवरदान करण्यात येते. आताही या दिवशी भिक्कूंना कठीण चीवरदान करण्यात येते.

सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे गौतम बुद्धाचे मुख्य शिष्य होते. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी सारीपुत्त यांना धम्मदीक्षा देण्यात आली होती. त्यांचे तीन भाऊ सुन्द, उपसेन व रेवत आणि त्यांच्या तीन बहिणी चाला, उपचाला व सिसुपाला यांनाही कार्तिकी पौर्णिमेला दीक्षा देण्यात आली होती. महामोग्गलायन यांचा खून कार्तिकी अमावास्येला करण्यात आला होता. सारीपुत्त यांचा जन्म जेथे झाला होता तेथेच त्यांच्या मूळ गावी नालक (नालाग्राम) येथे कार्तिकी पौर्णिमेला (इ.स.पूर्व ४८४ मध्ये) त्यांचे परिनिर्वाण झाले होते. परिनिर्वाणाच्या आधी त्यांनी त्यांची माता रुपसारी यांना धम्मदीक्षा दिली होती. सारीपुत्त यांच्या अस्थी गौतम बुद्ध यांनी राजा अजातशत्रू यांच्याकडे दिल्या. त्यांनी स्तूप बांधून त्यात त्या ठेवल्या. सारीपुत्त यांच्या परिनिर्वाणाच्या नंतर सहा महिन्यांनी गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले.

वाराणसी येथील उरुवेला काश्यप यांनी त्यांच्या पाचशे अनुयायांसह कार्तिक पौर्णिमेला धम्मदीक्षा घेतली. त्यांचे दोन भाऊ नदी काश्यप आणि गया काश्यप यांनाही त्यांच्या हजार शिष्यांसह तथागतांनी धम्मदीक्षा दिली. उरुवेला काश्यप यांचे परिनिर्वाणसुद्धा कार्तिकी पौर्णिमेला झाले होते.

धम्म पुनरूत्थानाचे कार्य श्रीलंकेत आणि भारतात अनागरिक धम्मपाल यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी केले. त्यांनी धम्मकार्यासाठी महाबोधि सोसायटी स्थापन केली होती. त्या सोसायटीतर्फे सारनाथ येथे मूलगंधकुटी विहार बांधण्यात आला. कार्तिक पौर्णिमेला त्या विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थी असलेला कलश ठेवण्यात आला. या अस्थी दर वर्षी कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने तीन दिवस दर्शनासाठी ठेवण्यात येतात. 

वरील कारणांमुळे कार्तिकी पौर्णिमा हा दिवस संपूर्ण जगभर पाळण्यात येतो. भारतातही या दिवशी अनेक कार्यक्रम ठेवण्यात येतात. अनेक घरीही हा दिवस पाळण्यात येतो. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी अनेक लोक जवळच्या पुरातन बौद्ध स्मारकात, लेण्यांमध्ये जातात. तेथे विविध कार्यक्रम घेतात. #adinama
-धनंजय आदित्य