Wednesday 1 November 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या शाळेची दुरावस्था



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विश्वप्रसिद्ध व्यक्तीच्या शालेय शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या शाळेचे आज जगप्रसिद्ध स्मारक व्हायला हवे होते; त्या शाळेची आजची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. संबंधितांच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे ही शाळा शेवटच्या घटका मोजत आहे. त्या शाळेच्या दुरावस्थेविषयी माहिती देणारा हा लेख.

.
साताऱ्यामध्ये छत्रपती प्रतापसिंह भोसले हे १८०८ साली राजेपदावर आरूढ झाले. त्यांनी साताऱ्यात पाणीपुरवठ्यासाठी पुणे-सातारा मार्ग, सातारा महाबळेश्वर मार्ग, पाणी पुरवठा योजना, तलाव, जलमंदिर, राजवाडा, अदालत वाडा, छापखाना, नगर वाचनालय, पाठशाळा, महिला शिक्षण, बहुजन दलित शिक्षण, लष्करी शिक्षण, इंग्रजी शिक्षण इत्यादी प्रगत गोष्टींना चालना दिली. त्यांनी १८५१ मध्ये सुरु केलेल्या सातारा हायस्कूलचे नामकरण नंतर छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असे झाले. २०१४ मध्ये सातारा नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ३८ वास्तूंची यादी सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केली. त्यात प्रतापसिंग हायस्कूलचा सुद्धा समावेश आहे. या शाळेने अनेक मोठमोठ्या लोकांना घडवले. त्यात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणतज्ञ कुलगुरू डॉ. देवदत्त दाभोळकर, सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्रगडकर, इंग्लंड मधील भारताचे राजदूत आप्पासाहेब पंत, कुलगुरू शिवाजीराव भोसले, रंग्लर परांजपे अशा दिग्गजांचा समावेश आहे.
.
या शाळेत ७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतला होता. बाबासाहेबांना आंबेडकर हे नामानिधान सुद्धा याच शाळेतून मिळाले. या प्रवेश दिवसाची आठवण म्हणून गेली अनेक वर्षे ७ नोव्हेंबर रोजी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन” येथील लोक थाटामाटाने साजरा करतात. गेल्या काही वर्षांपासून तर त्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा शाळा प्रवेश दिन साजरा केला जातो. २७ ऑक्टोबर २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाने खास परिपत्रक काढून ७ नोव्हेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा करावा असा आदेशही दिला आहे. ही शाळा अशा प्रकारे गौरविली जात असली तरी या शाळेची आजची अवस्था संवेदनशील व्यक्तींना रडू येईल अशी अत्यंत शोचनीय व दयनीय झाली आहे. हे स्थळ चांगले पर्यटन स्थळ होऊ शकते. परंतु त्यासाठी स्थानिक प्रशासन, राज्यशासन किंवा पुरातत्व खाते काहीही प्रयत्न करताना दिसत नाहीत.
.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ताब्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल ही एकमेव शाळा आहे. ही एकेकाळी नावाजलेली शाळा होय. छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल ही शाळा जुन्या राजवाड्यातील इमारतीत सुरु आहे. या शाळेस मोठी इमारत, भव्य मैदान, चांगले क्रीडांगण इत्यादी लाभले असूनही निव्वळ दुर्लक्षामुळे या शाळेची अवस्था बरीच खराब आहे. भोवतालच्या कंपाउंडची भिंत उध्वस्त झाली आहे. त्यामुळे दिवसा-रात्री केव्हाही कोणीही यावे अशी स्थिती आहे. शाळेच्या आवारात बिनधास्त कचरा फेकला जातोय. याला कचरा कुंडीचे स्वरूप आणून ठेवले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. नीट देखभालसुद्धा होत नाही. कंपाउंड तुटल्यामुळे पाण्याच्या टाकीकडून शाळेच्या परिसरात वर्दळ वाढली आहे. या शाळेकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसणे, त्यांचे पगार वेळेवर न होणे अशाही समस्या आहेत. या शाळेला पूर्ण वेळ मुख्याध्यापक सुद्धा नाही. उपजिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक हे अतिरिक्त पद सोपवण्यात आले आहे. २००० साली या शाळेत सुमारे ५०० विद्यार्थी शिकत होते. आजघडीस ही पटसंख्या २०० सुद्धा राहिली नाही. ही ओहोटी अशीच सुरु राहिली तर नजीकच्या भविष्यात ही शाळाच बंद पडण्याचा धोका आहे.
.
ही शाळा व वाडा म्हणजे उत्तम कलाकुसर, महिरपी भित्तीचित्रे यांचा कलात्मक नमुना होता. शाळेत १९७७ मध्ये अविचारीपणे रंग दिल्यामुळे शिसमसारख्या लाकडावरील रंगकाम, भित्तीचित्रे यांचा लोप झाला आहे. आर.टी.कूलकर्णी या कलाशिक्षकांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाड्यातील थोरल्या प्रतापसिंह महाराजांची बैठकीची खोली मात्र आज आपल्याला मूळ स्वरूपात पहायला मिळते.शाळेच्या जुना राजवाडा परिसरातील वसतिगृहाचा परिसरही उजाड, ओसाड झाला आहे. येथील दारे, खिडक्या लोकांनी काढून नेल्या होत्या. मध्यंतरी येथे दारुड्या लोकांचे अड्डे भरायचे. त्यांच्या बाटल्यांचा खच येथे साठला होता. येथील अनावस्थेच्या वाढत्या तक्रारीमुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या वर्षी मे मध्ये शाळेस भेट दिली होती. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी परिसराच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचे नंतर काय झाले ते कळले नाही. तसेच सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी शाळेस भेट देऊन येथे सुसज्ज ग्रंथालय निर्मितीसाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. त्याचेही काय झाले हेही समजले नाही. तीन वर्षांपूर्वी शाळेच्या दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत मिळालेला निधी जबाबदार लोकांच्या इच्छाशक्तीच्या अभावी परत गेला.
.
साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल ही शेतीशाळा म्हणून प्रसिद्ध होती. पण या शाळेत विद्यार्थ्यांना शेतीविषयक काहीही शिकवले जात नाही. येथील शेती शिक्षक १४ वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यानंतर दुसरे शिक्षक नेमण्यात आले नाहीत. या शाळेची माजी राज्यपाल गणपतराव तपासे मार्गाच्या लगत १८ एकर शेती आहे. त्यावर विद्यार्थ्यांना शेतीविषयक उत्तम धडे देऊन व्यावसायिक शिक्षणाचा संपूर्ण भारतात एक आदर्श निर्माण केला जाऊ शकतो. पण येथील शेती-शिक्षणाकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यानंतर ही जागा हडपण्यासाठी काही जण पुढे सरसावले. तेथील फेन्सिंग तोडण्यात आले. जागेतून अनधिकृत रस्ता काढण्यात आला. जागेसाठी आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. मध्यंतरी शेतीच्या या जागेवर गणपती विसर्जनासाठी तळे बांधण्यात यायचे. त्यासाठी सुमारे ४० लाखाचा खर्च करण्यात यायचा. जेसीबीने तळे खोदण्याच्या वेळी येथील संरक्षक भिंत सुद्धा तोडण्यात आली होती. त्यामुळे लोकांचा, जनावरांचा, अतिक्रमणवाल्यांचा उपद्रव वाढला. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाच्या मूर्त्याही येथे आणण्यात आल्या. त्या मूर्तींची माती, प्लास्टर ऑफ परीस, रसायने, निर्माल्य व कचरा यामुळे तो भाग शेती म्हणून वापरता येत नव्हता. परंतु मध्यंतरी काही जागृत नागरिकांनी या ऐतिहासिक जागेचा असा दुरुपयोग होऊ नये यासाठी प्रयत्न करून तसा ठराव पास करून घेतला. त्यामुळे या वर्षी पासून तेथे गणेश विसर्जन होणार नाही असे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले.
.
शाळेची अवस्था सुधारण्यासाठी येथील काही नागरिकांनी स्थानिक समाजसेवक गणेश दुबळे यांच्या नेतृत्वात छत्रपती प्रतापसिंह भोसले हायस्कूल बचाव समिती स्थापन केली आहे. तसेच येथील शिवान्तिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था व इतर संघटनांनी या शाळेच्या संवर्धनासाठी मोहीम उघडली आहे. त्यांनी पुढे केलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या अशा आहेत- शाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापकांची नेमणूक करावी, येथील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भराव्या, येथील वसतिगृह दुरुस्त करून पुन्हा सुरु करावे, येथील शेतीफार्म नीट सुरु करून आदर्श शेती-शाळा बनवावी, तेथे शेती संशोधन केंद्र सुरु करावे, ही हेरीटेज इमारत असल्यामुळे तेथे अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई व्हावी, या शाळेत सुरु करण्यात आलेले नगर पालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे कार्यालय नगर पालिकेच्या कार्यालयात न्यावे, येथील परिसर स्वच्छ व सुंदर करावा, कंपाउंड भिंत नीट बांधावी, शाळा परिसरातील अतिक्रमणे हटवावी इत्यादी.
.
शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस हा “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा करायचे ठरवल्यामुळे ही शाळा आता सर्व महाराष्ट्राचे, सर्व भारताचे तसेच जगातील करोडो लोकांचे एक प्रेरणास्थान व आकर्षणाचे केंद्र होणार आहे. साताऱ्याला भेट देणारा कोणीही चाहता या शाळेला भेट दिल्यावाचून राहणार नाही. अशा परिस्थितीत या शाळेची स्थिती चांगली ठेवणे हे प्रशासनाचे महत्वाचे कर्तव्य असणार आहे.
- धनंजय आदित्य.